देगलूर: विशेष प्रतिनिधी
बेकायदेशीर देशी दारू वाहतूक प्रकरणात डीबी पथकाने सोमवारी मध्यरात्री धडक कारवाई करत १ लाख ३४ हजार ४०० रुपयांची देशी दारू व बोलेरो पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणात नारायण विठ्ठलराव पप्पुरवार (रा. मरखेल) आणि अविनाश माधव राठोड (रा. कोडग्याळ तांडा, ता. मुखेड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबराव सगरोळीकर व बंगई यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास केदार कुंठा फाट्याजवळ कारवाई केली. करडखेडहून येणारे बोलेरो पिकअप वाहन (एम. एच. २५/पी-४५५३) थांबवून तपासणी केली असता, १८० एमएल क्षमतेच्या १९२० सीलबंद काचेच्या बाटल्यांचे ४० बॉक्स सापडले. या बाटल्यांवर “भिंगरी संत्रा लेबर” असे लिहिलेले होते.
जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत पुढीलप्रमाणे आहे:
देशी दारूच्या बाटल्यांचा एकूण अंदाजित दर: १,३४,४०० रुपये
बोलेरो पिकअप वाहनाची किंमत: ६ लाख रुपये
मिळून एकूण मुद्देमाल: ७ लाख ३४ हजार ४०० रुपये
साहेबराव सगरोळीकर यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या मंडळात मोठी खळबळ उडाली आहे.
