देगलूर/प्रतिनिधी
“देगलूर शहर स्वच्छतेचा जागर ग्रुप” यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी ८.१५ ते १०.१५ या वेळेत प्रेरणा गार्डन, पोस्ट ऑफिस देगलूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते गोकूळदास कोठारी व सौ. मीना कोठारी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश देण्यात आला.
या उपक्रमात ग्रुपच्या महिला कार्यकर्त्यांसह इतर सदस्य, नातवंडे व लहानग्यांनीही सहभाग घेतला. परिसरात विविध प्रकारची झाडे लावून “झाडे लावा, झाडे जगवा” ह्या संकल्पनेला बळ देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक कॅरिबॅग टाळण्याचे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले. सर्व सहभागी सदस्यांनी स्वच्छता व हरिततेचा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
