नांदेड/शेख असलम
कायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहतूकदाराकडून १७ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) नारायण शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. बिलोली न्यायालयाने दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
२३ जानेवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एपीआय नागरगोजे आणि पीएसआय शिंदे यांनी कायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहतूकदाराकडून लाच स्वीकारल्याची तक्रार लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोघांना १७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
आज, नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रीती जाधव आणि त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना बिलोली न्यायालयात हजर केले. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
