देगलूर/प्रतिनिधी
मन्याड नदीच्या कडेवर वसलेली वझरगा, तुपशेळगाव आणि गळेगाव ही तिन्ही गावे शेतीप्रधान असून, येथे शेकडो एकर शेती नदीच्या प्रभावाखाली आहे. मात्र, या गावांतील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पोहोचण्यासाठी मन्याड नदी पार करावी लागते, ज्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यास अपघातांचा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे वझरगा येथील शेतकरी अनेक वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पूल बांधण्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते.
या गंभीर समस्येची दखल घेत नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात थेट वझरगा येथे मन्याड नदीवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या या तातडीच्या कृतीमुळे शेतकऱ्यांनी आश्वस्त होत मोकळा श्वास घेतला आहे. ग्रामीण भागातील समस्यांना प्राधान्य दिल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
