देगलूर/प्रतिनिधी
13 मार्च रोजी होळी आणि 14 मार्च रोजी धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, सणाच्या आनंदात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अभिनाश कुमार यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, बिनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसवून वाहन चालवणे तसेच रॅश ड्रायव्हिंग करणे हे गुन्हे आहेत आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे असे कृत्य टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, धुलीवंदन साजरा करताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर रंग किंवा रंगाने भरलेले फुगे फेकू नयेत. वाहनांमध्ये बदल करून मोठ्या आवाजात फटाके वाजवणे किंवा इतर त्रासदायक कृती केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ड्रंक अँड ड्राइव्ह केसेससह नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी होळी व धुलीवंदन सुरक्षित व शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.
