शेख असलम/नांदेड
मुखेड–देगलूर मार्गावरील एकलारा ते केरूर दरम्यानचा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असून, हा मार्ग गावकऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून, रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत निवेदने देऊनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. या पार्श्वभूमीवर आज ९ जुलै रोजी एकलारा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होम-हवन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी केलं. सकाळी ११ वाजता एकलाराच्या प्रांगणात ५१ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्रोच्चार करत हवन करत सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ईश्वरचरणी प्रार्थना करत रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी सुबुद्धी यावी, ही सामूहिक मागणी करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा, तालुका, विधानसभा स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांना शिवसेना जिल्हाप्रमुख बारसे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
हा रस्ता अपघातांचा मळा बनला असून, दुचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात, अपंगत्व आणि मृत्यूच्या घटनांनी गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. आंदोलनस्थळी पोलीस उपनिरीक्षक फड यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या अनोख्या आंदोलनाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर यांनी केले होते. आंदोलनस्थळी उपस्थित शिवसेना नेत्यांनी भावनिक भाषणांतून प्रशासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला आणि हा रस्ता दुरुस्त होईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
शांततामय परंतु प्रभावी पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनामुळे सरकार व प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वळेल, अशी गावकऱ्यांची आशा आहे.
