खाजगी वाळू स्थळाच्या नावाखाली शासकीय नदी पात्रातून उत्खनन
नांदेड//प्रतिनिधी
बिलोली तालुक्यात शासकीय नदीपात्रा शेजारी शेत जमीन विकत घेऊन त्या शेतातून वाळू निष्कासित करण्याची परवानगीच्या नावाखाली शासकीय नदी पात्रातून वाळू उत्खनन करण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात तालुक्यात चालवीला जात आहे.सध्या गंजगाव येथील खाजगी वाळू स्थळाच्या नावाखाली दिवस रात्र जेसीबीद्वारे वाळूचे उत्खनन करून ठेकेदाराने शासनाच्या महसूल ला लाखोंचा चुना लावला आहे. जिह्वाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन करून परवानगी दिलेल्या ब्रास पेक्षा जास्त उत्खनन ठेकेदाराने केले असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांस हाताशी धरून दररोज हजारो ब्रास वाळूचे उत्खनन ठेकेदाराने केले असल्याने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्या जात आहे. या गोरख धंद्याची चौकशी करून हे खाजगी वाळू स्थळ तात्काळ बंद करावे व या ठेकेदाराकडून दंड वसुल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.
बिलोली तालुक्यात नदी पात्रा शेजारी असलेल्या शेतातून वाळू निष्कासित करण्याची परवानगी अनेक शेतकऱ्यांनी मागितली आहे. शेतात वाळू नसतानाही भूमी अभिलेख, कृषी अधिकारी, भुजल, महसूल अधिकारी यांना हाताशी धरून आपल्या शेता वाळू असल्याचा अहवाला आधारे जिल्हाधिकाऱ्याकडे वाळू काढण्याची परवानगी अनेकांनी घेतली आहे. सध्या गंजगाव येथील खंडू तिप्पाजी गायकवाड यांच्या गट क्रमांक 239 मधून उपलब्ध वाळू साठा 1690 ब्रास उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.परंतु या खाजगी वाळू स्थळाच्या नावाखाली शासकीय नदी पात्रातून चार जेसीबी द्वारे रात्रंदिवस वाळूचे उत्खनन चालु आहे. दररोज 100 ते 150 गाड्याद्वारे वाळूची वाहतूक होत आहे. एका एका गाडीत 6 ते 8 ब्रास वाळू भरली जात आहे. शासनाने दिलेल्या ब्रासची क्षमता चार ते पाच दिवसात संपवून टाकली व अधिकचे उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीला या खाजगी वाळू स्थळाची चौकशी करून हे वाळू स्थळ तात्काळ बंद करावे. व या ठेकेदारकडून दंड वसुल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
