देगलूर/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे देगलूर तालुका, मुखेड तालुका, बिलोली तालुका तसेच नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे तूर, सोयाबीन, उडीद, मूग इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक घरांचीही पडझड झाली आहे.
याबाबत भिमशक्ती सामाजिक संघटना नांदेड दक्षिण विभागाच्या वतीने नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे, शिवसेना (उबाटा गट) तालुका अध्यक्ष महेश पाटील, मुखेड तालुका अध्यक्ष आकाश कांबळे, अर्धापूर तालुका अध्यक्ष साहेबराव लोखंडे, भीमशक्तीचे मार्गदर्शक संजय महाराज किरजवळेकर, अडवोकेट अमोल वाघमारे, रमेश केसरे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी देगलूर तालुक्यातील तपशेळगाव व लखा गावाचे सविस्तर परिस्थितीचे वर्णन केले. तपशेळगाव हे पूर्णपणे पाण्याखाली वेडल्यामुळे रस्ता पूर्णपणे उकडून गेला असून त्या रस्त्यावर निधी उपलब्ध असूनही संबंधित गुत्तेदार काम करत नसल्याची माहिती दिली. यामुळे गावाचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.
भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी त्यासाठी वेगळ्या निवेदनाद्वारे प्रशासनाच्या दृष्टीस आणण्याचे सुचविले आहे.
याशिवाय लखा गावाचे नागेश भालेराव यांनी आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी अमर उपोषणाला बसून रस्त्याचे तातडीने काम व्हावे, अशी मागणी केली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना या परिस्थितीची पूर्ण कल्पना देण्यात आली असून पुढील आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे…
