नांदेड/प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईतील मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते.
या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्या समवेत राज्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, ना. हेमंत पाटील, खा. अजित गोपछडे, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अमर राजुरकर, तसेच माजी सनदी अधिकारी बालाजी पाटील खतगावकर यांचीही उपस्थिती होती.
बैठकीत नांदेड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नगर विकास विभागाचे सचिव, उपसचिव तसेच नांदेड जिल्हाधिकारी व महानगर आयुक्त यांनी संबंधित प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
या बैठकीच्या माध्यमातून नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता असून, महापालिकेच्या आराखड्यातील अडचणी दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
