मुखेड प्रतिनिधी/मुस्तफा पिंजारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत (एनएचएम) कंत्राटी कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यासाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर असल्यामुळे आणि वैद्यकीय अधिकारी आपल्या वैयक्तिक कामासाठी अनेक दिवसांपासून रजेवर असल्याने शासनाच्या विविध आरोग्य सुविधांचा डंका वाजवणारी आरोग्य यंत्रणा आता सलाईनवर आहे.
मुखेड सारख्या अत्यंत डोंगराळ व दुर्गम अशा भागात असणारे बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे गोरगरीबांसाठी एक नवसंजीवनी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील तब्बल १८ गावांचा संपर्क असुन येथील आरोग्य यंत्रणा फक्त एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर चालते मात्र तेही वैद्यकीय अधिकारी जर आपल्या कर्तव्यात दांडी मारुन अनेक दिवसांपासून गैरहजर राहत असल्याने येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्यामुळे नागरिक आरोग्य कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करत आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन या दिवसाचे ढगाळ वातावरण व मध्येच कोसळणारा रिमझिम पाऊस अशा वातावरणात ताप,खोकला, सर्दी,अंगदुखी यांसारख्या आजारांची वाढ झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.अशा कठीण परिस्थितीत आरोग्य केंद्रात कोणताच वाली अथवा वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच या केंद्रात हजेरी पटावर ११ कर्मचाऱ्यांची नोंद असूनही वैद्यकीय अधिकाऱ्यासह काहींना वगळता मोजकेच कर्मचारी दैनंदिन हजर राहत असुन या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज समुदाय आरोग्य अधिकाऱ्यावर सोडले आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत काही कर्मचारी व आरोग्य सेविकांच्या कामचुकारपणा व अनुपस्थितीमुळे गावातील व परिसरातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी मोठा प्रश्न निर्माण होत असुन ऐन वेळी कोणतीही आरोग्य सेविका फोन न उचलने कधी उचलला तर स्टाफ मधील एकमेकांवर हात झळकत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. येवढेच नसुन तर प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाकडून मिळालेली रुग्णवाहिका सुद्धा वै.अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे तब्बल दोन महिन्यांपासून बंद पडल्याने आपात्कालीन रुग्णांसाठी शहराकडे रेफर करण्यासाठी गोरगरिबांनी आता कोणता पर्याय निवडावा ? आणि वैद्यकीय अधिकारी अनेक दिवसांपासून रजेवर अन् आरोग्य सेविका संपावर असल्यामुळे मग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभार कोणाकडे? असा प्रश्न नागरिकांकडून ऐकायला मिळत असुन याकडे आता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
